मुंबई : शासकीय सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून सरकारची फसवणूक केल्याच्या 1995 सालच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर प्रथम वर्ग न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंटनंतर आता नाशिक पोलिसांची हालचाल वेगाने सुरू झाली आहे.
माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना रुग्णालयातूनच अटक केली जाणार का, याबाबत चर्चा रंगली असून नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मागवली आहे. कोकाटेंची सध्याची वैद्यकीय स्थिती, डॉक्टरांचा अहवाल आणि कायदेशीर बाबींची सखोल पडताळणी केली जात आहे. कायदेशीर पडताळणी केल्यानंतर नाशिक पोलीस पुढील निर्णय घेणार आहेत.
नाशिक पोलीसांकडून विजय कोकाटेंचा शोध सुरू
दरम्यान, या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. विजय कोकाटे सध्या कुठे आहेत, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने नाशिक पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक होणार?
1995 साली कागदपत्रांची फेरफार करून शासकीय सदनिका मिळवल्याचा आरोप कोकाटे बंधूंवर आहे. या प्रकरणात दोघांनाही दोन वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला असून, जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवल्याने कोकाटे बंधूंच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे माणिकराव कोकाटेंच्या रुग्णालयातील उपचारांमुळे पोलिसांची पावले थोडी थांबलेली असली, तरी दुसरीकडे विजय कोकाटेंच्या शोधासाठी हालचाली अधिक तीव्र झाल्या आहेत. तर, कायदेशीर पडताळणीनंतर नाशिक पोलीस नेमका काय निर्णय घेतात, माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक होणार का आणि विजय कोकाटे पोलिसांच्या हाती लागतात का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.